|
Photo Credit : pinterest.com |
देवांचा देव महादेवाची देश विदेशात अनेक भव्य मंदिरे आहेत. महादेवाची १२ ज्येातिर्लिंगेही प्रसिद्ध आहेत. परदेशातही महादेवाची भव्य मंदिरे उभारली गेली आहेत मात्र जगातील सर्वाधिक उंचीवरचे शिवमंदिर भारतातच आहे. उत्तराखंड मधील रूद्रप्रयाग जिल्ह्यातले हे शिवमंदिर तुंगनाथ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ३६८० मीटर म्हणजे साधारण १४ हजार फुटांवर आहे. उत्तराखंडमध्ये पंचकेदार म्हणून शिवाची जी पाच पवित्र स्थाने आहेत त्यातील तुंगनाथ हे एक आहे. हजारो वर्षांपूर्वी पांडवांनी ही पाची मंदिरे बांधली असल्याचे सांगितले जाते. ट्रेकर्स लोकांसाठी पंचकेदारचा ट्रेक हे एक आव्हान असून अनेक ट्रेकर्स तो मोठ्या जिद्दीने पार करत असतात.
या मंदिराची कथा अशी सांगतात की महाभारतातील युद्धसंहारानंतर पांडवांनी आपल्याच नातेवाईकांना ठार केल्याने लागलेले पाप धूवून निघावे म्हणून शंकाराची उपासना केली. मात्र शंकर त्यांच्यावर रागावलेले होते. महादेवाच्या शोधात पांडव फिरत असताना महादेवांनी बैलाचे रूप घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र भीमाने त्यांना ओळखून थोपविण्याचा प्रयत्न केला. जमिनीत घुसत असलेल्या या बैलरूपी महादेवांच्या शरीराचे अवयव पाच विविध ठिकाणांतून बाहेर आले व तेथे तेथे पांडवांनी मंदिरे उभारली.
पैकी केदार येथे बैलाच्या मागचा भाग आहे. तुंगनाथ येथे महादेवांचे हात आहेत. रूद्रनाथ येथे डोके, मध्यमेश्वर येथे शरीराचा मधला भाग तर कल्पेश्वर येथे जटा आहेत. तुंगनाथ चंद्रशील शिखरांच्या पार्श्वभूमीवर असून येथे रावण व राम या दोघांनीही शंकराची उपासना केली होती असाही समज आहे.
No comments:
Post a Comment