या देवीला होतो मानवी रक्ताचा चरणाभिषेक, DURGA TEMPLE - BANSGAON GORAKHPUR

DURGA TEMPLE-BANSGAON
Photo Credit : youtube.com
गोरखपूर पासून जवळ म्हणजे साधारण ४० किमी वर असलेले बांसगाव हेही प्रसिद्ध गांव आहे ते तेथील दुर्गा मातेच्या मंदिरामुळे व या ठिकाणी देवीला मानवी रक्ताचा टिळा लावला जात असल्यामुळे. या गांवात देवीला प्रत्यक्षात बळी दिला जात नाही तर माणसाच्या शरीरावर नऊ ठिकाणी जखमा करून त्यातून वाहणारे रक्त देवीच्या चरणांवर वाहिले जाते. २०० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू असून यात नवजात बालकापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांचे रक्त येथे वाहिले जाते.

अर्थात या प्रथेत कोणताही बळजबरीचा वा अनिच्छेचा भाग नाही. या भागातील श्रीनेतवंशी राजपूत ही प्रथा पाळतात. नवरात्रीला नवमीच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी असते व या समाजातील प्रत्येक सदस्य देवीला रक्त अर्पण करतो. यावेळी केल्या गेलेल्या जखमा पिंपळाच्या पानाने पुसून त्यावर देवीचा अंगारा लावला जातो व जखमी कितीही खोल असली तरी दोन दिवसांत ती पूर्ण बरी होते. तसेच असे रक्तदान करणार्‍यांच्या घरात सुखसमृद्धी राहते असाही भाविकांचा विश्वास आहे.

ही प्रथा कशी सुरू झाली याविषयी सांगताना येथील वृद्ध सांगतात पूर्वी या देवीला रेड्याचा बळी दिला जात असे व नवमीच्या दिवशी असंख्य रेडे येथे मारले जात. या प्रथेला विरोध म्हणून ही प्रथा बंद केली गेली तेव्हाच रजपूत लोकांनी रेड्याऐवजी स्वतःचे रक्त देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून ही प्रथा आजही पाळली जाते. हे रक्तदान अतिशय समर्पित भावनेने केले जाते व यामुळे जीवनातील दुःखे दूर होतात असाही विश्वास आहे.

No comments:

Post a Comment