पंढरपुर - महाराष्ट्र, PANDHARPUR - MAHARASHTRA

Vitthal pandharpur
Photo Credit : pinterest
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी,
माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पाप भंगा।।

किंवा

जन्मासी येऊनी पहा रे पंढरी।।

किंवा

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।।

अशा भावपूर्ण शब्दांत पंढरपूरचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.

पंढरपूर म्हटले की डोळ्यासामेर येते विठ्ठलाचे सावळे, सुंदर, मनोहर रूप. पंढरपूरला दक्षिणेतील काशी असेही म्हटले जाते. एवढे मोठे पावित्र्य या तीर्थक्षेत्राला आहे. महाराष्ट्राला अनेक संतांचा वारसा लाभला आहे. या संतांच्या शिकवणीतूनच महाराष्ट्राची संस्कृती अधिक परिपूर्ण झाली आहे. या सर्व संतांचे आराध्य दैवत म्हणजे हा पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांचे माहेरघर म्हणजे पंढरी होय.

येथील विठ्ठलाच्या मूर्तीविषयी अशी कथा सांगितली जाते की, प्रत्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन येथे प्रकटला. दानवांच्या लढाईत श्रीकृष्णाला मुचकुंद राजाने बरीच मदत केली. ते बघून श्रीकृष्णाने त्याला वर मागावयास सांगितला. तेव्हा राजा म्हणाला तुझे हेच रूप कायम माझ्या डोळ्यासमोर असेच उभे राहू दे. तेव्हा श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन पंढरपूर येथे आपल्या भक्ताच्या भेटीला आले व राजा मुचकुंद यांनी भक्त पुंडलिकाच्या रूपात दुसरा जन्म घेतला. पंढरपूर येथील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पांडुरंगाचे व रुक्मिणीचे वेगळे मंदिर आहे. पांडुरंगाचे मंदिर म्हणजे शिल्पकलेचाही  एक उत्तम नमुना आहे.

पंढरपूरला चार मुख्य यात्रा असतात. १) आषाढी २) कार्तिकी ३) माघी ४) चैत्री. यापैकी आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून असंख्य भाविक, अनेक संतांच्या पालख्या घेऊन पायी चालत-वारीने-या पांडुरंगाच्या भेटीला येतात. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आन्ध्र प्रदेश, तामीळनाडू या राज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.पंढरपूर ते सोलापूर हे अंतर ६७ कि. मी. आहे. तर पंढरपूर ते पुणे हे अंतर २१७ कि. मी. आहे. येथे भक्तांसाठी राहण्याच्या सोयीसाठी अनेक आश्रम, धर्मशाळा उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment