शिर्डी - महाराष्ट्र, SHIRDI - MAHARASHTRA

SAIBABA - SHIRDI
Photo Credit : Dwarkamai.com
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे थोर संत श्री साईबाबा अनेक वर्षे राहिले. येथे राहूनच त्यांनी भक्तगणांना भक्तिमार्गाविषयी आपल्या कृतीतून मार्गदर्शन केले. श्रद्धा व सबुरी अशी दोन सुत्रे जगण्यासाठी देणार्‍या श्री साईबाबांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला शिर्डी येथे समाधी घेतली. पुढील काळात येथे प्रशस्त मंदिर बांधण्यात आले व श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली.१९२२ साली हे मंदिर बांधले आहे. गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या वाढते आहे. शिर्डी संस्थानात भाविकांसाठी निवास, भोजन, प्रसाद अशा सोयी केल्या आहेत. उत्कृष्ट व्यवस्था होण्यासाठी अनेक इमारती बांधल्या आहेत.

इटालीयन संगमरवरातील श्री साईबाबांची सुंदर, विशाल मूर्ती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच संगमरवरातील समाधीस्थानही अतिशय पवित्र, देखणे आहे. नागपूरच्या गोपाळराव बुटींनी मुरलीधराच्या मंदिरासाठी शिर्डीत बांधकाम करून घेतले. परंतु साईबाबाच तेथील मुरलीधर झाले असे म्हटले जाते. शिर्डीमध्ये बालयोग्याच्या रूपात पोहोचलेले साईबाबा जेथे राहत, त्याला द्वारकामाई म्हणतात.ते ज्या कडुनिंबाच्या झाडाखाली प्रथम दिसले त्याला गुरुस्थान असे नाव आहे. ज्या ठिकाणी ते झोपत, त्या स्थानाला चावडी म्हटले जाते. श्री साईबाबांनी दररोज पाणी घालून तयार केलेली बाग लेंडीबाग म्हणून जतन केली आहे. तिथे कडूनिंबाच्या झाडाखाली बाबा रोज विश्रांती घेत असत. मंदिराच्या परिसरातच श्री साईबाबा ज्यावर नेहमी बसत, ती शिळाही दर्शनासाठी ठेवलेली आहे.

SAIBABA - SHIRDI
Photo Credit : wikipedia
श्रीसाईबाबा ज्या वस्तू दररोज वापरत, त्या व्यवस्थित ठेवून एक संग्रहालय केले आहे. साईबाबांचा पाण्याचा डबा, पादूका, जाते, हुक्कादाणी, कफनी, खडावा या वस्तू पाहण्यास मिळतात. त्यांचे दुर्मीळ फोटोही इथे पाहायला मिळतात. मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. मनमाड जंक्शनपासून फक्त ६० कि. मी. वर शिर्डी आहे. त्यामुळे रेल्वेने येथे सहज पोहोचता येते. जगभरातून लाखो लोक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात.

No comments:

Post a Comment