शेगांव - बुलढाणा महाराष्ट्र, SHEGAON - BULDHANA MAHARASHTRA

SHEGAON
Photo Credit : Pinterest / ijiya.com
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळचे हे ठिकाण संत गजानन महाराज यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले आहे. शेगावमध्ये इ. स. १८७८ साली गजानन महाराजांना प्रथम बंकटलाल आणि दामोदर यांनी पाहिले. ते समर्थ रामदासांचे अवतार मानले जातात. योगशास्त्र, वेदशास्त्रात ते पारंगत होते. तपश्चर्या केलेली असल्याने त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या. प्राणी, पक्ष्यांची भाषा त्यांना समजत असे. लोकांचे वैयक्तिक, प्रापंचिक प्रश्र्न सोडवत सोडवत त्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांनी दिलेला मंत्र होय.

लोकमान्य टिळक, अण्णासाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे असे अनेक नामवंत त्यांचे भक्त होते. अंगावर कपडे नाहीत, कुठेही मिळेल ते अन्न घेणे, कुठेही आडवे होऊन झोपून जाणे, कोणतीही वस्तू संग्रही न ठेवणे अशा कृती करणारे ते अवालिया सत्पुरुष होते. पंढरपूरच्या पांडुरंगासमोर १९१० मध्ये त्यांनी हे जग सोडण्याचा निर्णन भक्तांना सांगितला. त्यापूर्वी १९०८ मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असे सांगितले होते. भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. १९१० मध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख - वार - दिवस भक्तांना सांगितला, समाधीची जागाही निश्र्चित करून दाखवली. दिनांक ८ सप्टेंबर, १९१० मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला, गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.

विदर्भातील अनेक पंडित, गुरू, आचार्य त्यांची भेट घेत. ते विष्णूचे अवतारही मानले जातात. म्हणूनच ‘विदर्भाचे पंढरपूर शेगाव’ असे याचे वर्णन करतात. भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे, आशीर्वाद देणे आणि स्वत: सातत्याने फक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिनी असे. गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरून गेला आहे. शेगावमधील श्री राममंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी, ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबलेले असते. शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थानच्या प्रयत्नांमुळे तिथे बर्‍याच शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. दर्शनाला येणार्‍या भाविकांसाठीही येथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
SHREE GAJANAN MAHARAJ SHEGAON
Photo Credit : Pinterest
SHEGAON
Photo Credit : Pinterest
SHEGAON
Photo Credit : Pinterest

No comments:

Post a Comment