रशियातील गूढरम्य डान्सिंग फॉरेस्ट, MYSTERIOUS DANCING FOREST - RUSSIA

DANCING FOREST
Photo Credit : Pinterest
जगात अनेक सुंदर सुंदर जंगले आहेत व जंगलप्रेमी पर्यटनाचा विचार मनात आला की प्रथम जंगलांना भेट देण्याचाच विचार करतात. तेथील अनटच्ड निसर्ग, दाट घनघोर झाडी, पक्षी, वन्य प्राणी, तेथील निरव शांतता आणि स्वच्छ वातावरण याचा मोह न टाळता येण्याजोगाच असतो. जगात अनेक प्रकारची जंगले आहेत त्यातील कांही पाहायला फारच मजेदार व एकदम वेगळी आहेत.

रशियातील डान्सिंग फॉरेस्ट हे असेच एक अजब जंगल आहे. वास्तविक हा कालिनिग्राड भागातील क्युरोनियन स्प्लीटमधील नॅशनल पार्कचा एक भाग आहे. त्यातील १ चौरस किलोमीटर परिसरात हे डान्सिंग फॉरेस्ट आहे. देवदाराचे हे जंगल तेथील झाडांच्या युनिक आकारामुळे प्रसिद्ध आहे. या झाडांना अजब वर्तुळाकार प्राप्त झाले आहेत. म्हणजे झाडाची खोडे गोल गोल आकारात किंवा हत्तीच्या सोंडेप्रमाणे कमानदार आकारात वाढली आहेत. कांही ठिकाणी तर या खोडांचे लूपही तयार झाले आहेत. ही झाडे या प्रकारचे वाढण्यामागचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

स्थानिक लोक या भागाला पिअक्कड म्हणजे ड्रंकन फॉरेस्ट म्हणतात. असे सांगितले जाते की फर्निचर बनविणार्‍या सुतारांनी मुद्दाम या झाडांना असे आकार यावेत यासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांना युनिक फर्निचर तयार करणे सोपे जाते. मात्र याला सबळ पुरावा नाही.या झाडांची लागवड १९८० च्या सुमारास केली गेली आहे. स्थानिकांच्या मते हा भाग दैवी शक्तीने भारलेला आहे. जो कुणी या झाडांच्या खोडांच्या लूपमधून जातो, त्याला रोगमुक्ती मिळते तसेच आरोग्य प्राप्ती होते व अनेकदा अमानवी शक्तीही मिळतात. झाडाच्या खोडाच्या लूपमधून एकदा पार गेले की १ वर्षाने आयुष्य वाढते असाही समज आहे.

कांही कथांनुसार येथे रात्री चेटकीणींचा नाच चालतो व त्यांच्या तालामुळे झाडांची खोडे अशी विचित्र वाढतात. २००६ साली या भागात सरळ वाढणार्‍या देवदारांपासून तसेच या वाकड्या झाडांपासून नवी रोपे लावली गेली आहेत. त्यांची वाढ नेहमीपेक्षा खूपच कमी होत असल्याचे दिसून आले आहे. नवी झाडे सरळ वाढतील की तीही या झाडांप्रमाणेच विचित्र आकारात वाढतील याचे निरीक्षण केले जात आहे.
DANCING FOREST
Photo Credit : Pinterest
DANCING FOREST
Photo Credit : Pinterest

No comments:

Post a Comment