धनोल्टी- शांत, नितांतसुंदर हिल स्टेशन, DHANAULTI-UTTARAKHAND

DHANAULTI-UTTARAKHAND
Photo Credit : wikipedia.org
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाचे बेत आखण्यास वेग येतो. हिमाचल, उत्तराखंड राज्ये या दृष्टीने लोकप्रिय आहेत मात्र येथील बहुतेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर या काळात पर्यटकांची मोठी गर्दी असते. चार दिवस शांततेत, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि मनोहारी निसर्गाचे डोळेभरून दर्शन घ्यायची इच्छा असलेल्या पर्यटकाना उत्तराखंडमधील धनोल्टी हा फारच खास पर्याय आहे. येथे निसर्ग जणू बाहु पसरून तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतो आणि निरव शांततेत डोळे निवेपर्यंत निसर्गाची विविध रूपे तुम्ही चवीचवीने पाहू शकता.

डेहराडूनपासून साधारण दोन अडीच तासांचा कार प्रवास करून धनोल्टीला पोहोचता येते. उंच, दाट देवदारांची बने, चोहोबाजूना पसरलेली हिरवळ, ढगांची लपाछपी, पाहता पाहता आपल्याला तसेच आसपासच्या परिसराला वेढून टाकणारे मेघ, मन आणि शरीर कसे ताजेतवाने करून टाकतात. समुद्रसपाटीपासून ७५०० फूट उंचावर असलेले हे शांत पहाडी गाव. उन्हाळ्यातही येथले तापमान २० डिग्रीच्या आसपासच असते. गढवाल निगम सह येथे हॉटेल्स आहेत. आणि प्रत्येक हॉटेलमधून डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग आकंठ पिता येतो. पायी भटकण्याचे सुख येथे मनमुराद लुटता येते कारण येथे तुलनेने गर्दी कमी असते.

DHANAULTI-UTTARAKHAND
Photo Credit : wikipedia.org
या गावापासून ६ किमीवर सुरकुंडा देवीचे स्थान आहे. दोन्ही बाजूंनी विविध वस्तूंनी लदलेल्या या छोट्याशा रस्त्यातून केलेले भटकंती आनंददायी होते. देवी दर्शनासाठी थोडे वर चढून जावे लागते. १५ एकर परिसरात असलेले इको पार्कही आवर्जून भेट द्यावे अ्रसे. येथे खेळण्यासाठी बर्मा ब्रिज, फ्लाईंग फॉक्स अशी अनेक आकर्षणे आहेत. लांबलचक, वळणदार ढगांत हरविलेले रस्ते, दोहो बाजूंनी फुललेले रंगबेरंगी फुलांचे ताटवे, जागोजागी असलेले मेडिटेशन स्पॉटस आबालवृध्दांसह सर्वांनाच आनंद देणारे आहेत.फोटोग्राफ प्रेमींसाठी ही ट्रीप यादगार ठरू शकते.

परतताना डेहराडूनच्या अलिकडे १४ किमी असलेले विशाल शिवमंदिर जरूर पाहावे. येथे प्रसाद घेऊन पुढे येणार्‍या रॉबर्ट केव्हज अथवा स्थानिक भाषेत गुच्चूपानी गुहांना भेट द्यावी. डेहराडूनजवळच गुडघाभर पाणी असलेले हे लांबलचक भुयार कधी काळोखात तर कधी प्रकाशाच्या खेळात असे जादुई भासते की त्याचे वर्णन करणे अशक्य. हा अविस्मरणीय अनुभव घ्यायलाच हवा.
DHANAULTI-UTTARAKHAND
Photo Credit : wikipedia.org
DHANAULTI-UTTARAKHAND
Photo Credit : wikipedia.org
DHANAULTI-UTTARAKHAND
Photo Credit : wikipedia.org

No comments:

Post a Comment