देवगिरी (दौलताबाद) किल्ला, DEVGIRI ( DAULATABAD ) FORT

DEVGIRI FORT
Photo Credit : wikimedia.org
महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशे किल्ले इतिहासाचे मुक साक्षीदार बनुन उभे आहेत. आदळणाऱ्या समुद्री लाटा, कोसळणाऱ्या वरूणसरी आणि भाजुन काढणारा अग्निसूर्य यांनी त्यांच्या भक्कम चिरेबंदीला अनेक खिंडारे पडलेली दिसतात. त्यातुनही प्राचीन महाराष्ट्राचे लष्करी सामर्थ्य ठळकपणे जाणवते. देशात इतरत्र कोठेही इतक्या बहुसंख्येने किल्ले आढळत नाहीत. त्यातही किती वैविध्य असावे! काही सागरी बेटांवर दिमाखात उभे आहेत तर काही डोंगरशिखरांचे देखणेपण वाढवित आहेत!!      

महाराष्ट्रातील बहुतांश जलदुर्ग किंवा भूदुर्ग शिवरायांच्या कारकिर्दीशी निगडीत आहेत. हा थोर मराठा योद्धा तितकाच महान संघटकही होता. पन्हाळ्यासारखे काही किल्ले म्हणजे जणु छोटी गावेच होती. व्यापाराच्या मिषाने भारतात आलेल्या पोर्तुगिजांनीही येथे काही अशी छोटी गावे वसविली, त्यांच्या संरक्षणासाठी किल्ले बांधले. आज उन्हापावसाने विदीर्ण झालेले किल्ले बदलत्या काळाचे साक्षीदार तर आहेतच, पण इतिहासाचा निश्चित आकार देण्यात त्यांचे स्थान नक्कीच महत्वाचे ठरले आहे. त्यांच्या पडझड झालेल्या भिंतींमधुन आजही इतिहासाची स्पंदने जाणवतात.

औरंगाबादच्या उत्तरपूर्वेस ११ किमी अंतरावर देवगिरी किल्ला दृष्टीस पडतो. या दुर्गम पहाडी किल्ल्यास पुढे दौलताबादचा किल्ला म्हणुन ओळखु लागले. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शंकू आकाराच्या ज्या कड्यावर हा किल्ला दृष्टीस पडतो, तो पहाड आजुबाजुच्या सपाट मैदानापासुन एकदम १९० मीटर उंच उचलल्यासारखा दिसतो. तिहेरी संरक्षण तटबंदीने किल्ल्याच्या दुर्गमपणात आणखीनच भर घातली आहे. शत्रुवर नजर ठेवण्यासाठी या संरक्षक भिंतीत अनेक सज्जे बांधले आहेत. भरीव पाषाण फोडुन बनविलेले तट, बुरूज, भुयारी मार्ग आणि खंदक ही देखील या किल्ल्याची लक्षणीय वैशिष्ट्ये! या भुयारी मार्गाच्या तोंडाशी लोखंडी जाळी बसविली असुन, शत्रुने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास तेथे मोठा जाळ पेटवुन त्याला अटकाव केला जाई. चांदमिनार, चिनी महाल आणि बारादरी ही ऐतिहासीक महत्वाची बांधकामे आजही या किल्ल्यात पहावयास मिळतात.

दौलताबादवर ताबा मिळविण्यासाठी अलाउद्दीन बाहमन शाहने इ.स. १४३५ मध्ये चांदमिनार बांधला. त्याची उंची ६३ मीटर एवढी आहे. या चांदमिनारच्या बरोबर विरुद्ध दिशेस जुम्मा मशीद पहायला मिळते. तिचे खांब पूर्वी एका मंदिराचा हिस्सा होता असे म्हणतात. या मशीदीजवळच पाषाणात एक मोठा हौद खोदलेला दिसतो. गोवळकोंड्याचा शेवटचा सम्राट म्हणजे अब्दुल हसन ताना शाह. इ.स. १६८७ मध्ये औरंगजेबने त्याच्या मुसक्या बांधुन ह्याला चिनी महालमध्ये कैदेत ठेवले होते. याच्या जवळच एक प्रचंड मोठा गोलाकार बुरूज दृष्टीस पडतो. या बुरुजाच्या शिरोभागी भलीमोठी अणकुचीदार तोफ ठेवली आहे. याला ‘किला शिकन’ किंवा ‘दुर्ग भेदी’ बुरूज म्हटले जाते. किल्ल्याच्या अगदी शिखरापाशी अष्टकोनी आकाराची बारादारी आहे. शिखरावर असलेल्या मुख्य बुरुजावर देखील एक तोफ पहावयास मिळते. 

यादव राजा भिल्ल्न याने इ.स. ११८७ मध्ये देवगिरी नगराची स्थापना केली. पुढे १२१० ते १२४६ या कालखंडात सिंघना (द्वितीय) याच्या राजवटीत किल्ल्याचे बांधकाम पुर्ण झाले. अल्लाउद्दिन खिल्जीने इ.स. १२९४ मध्ये या परिसरावर ताबा मिळविला. दख्खनच्या पठारावरील हे पहिलेवहिले आक्रमण मानले जाते. अखेरीस इ.स. १३१८ मध्ये मलिक काफुरने हरपाल या शेवटच्या यादव राजाला ठार मारले. पुढे इ.स. १३२७ मध्ये मुहम्मद-बिन-तुघलकने दिल्लीतील आपले सगळे प्रजाजन देवगिरी येथे हलवले. त्याने या नगराचे नाव दौलताबाद ठेवले व येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याच्यानंतर इ.स. १५२६ पर्यंत तेथे बाहमनींची राजवट होती. नंतर मात्र औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत, म्हणजे इ.स. १७०७ पर्यंत त्यावर मुस्लीमांचाच ताबा होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा कब्जा हैद्राबादच्या निजामाकडे आला. सुप्रसिद्ध वेरुळच्या गुंफा दौलताबादपासुन फक्त १६ किमी अंतरावर आहेत. 
DEVGIRI FORT
Photo Credit : wikimedia.org
DEVGIRI FORT
Photo Credit : pinterest.com
DEVGIRI FORT
Photo Credit : pinterest.com

No comments:

Post a Comment